नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्ष जोरात तयारीला लागले आहेत. लोकसभेला निवडणुकीत महायुतीला आणि वैयक्तिक भाजपला अपेक्षित यश मिळाल नाही. म्हणून आता भाजपने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खोटे नॅरेटिव्ह सेट करण्यास विरोधक यशस्वी झाल्याने लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नाही. त्यामुळे आता तो खोडून काढण्याची जबाबदारी आपली असल्याचा आवाहन वनमंत्री व पूर्व विदर्भाचे निरीक्षक सुधीर मुनगंटीवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले आहे. पूर्व विदर्भातील भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीला ते संबोधित करीत होते.
रविभवन येथे आज झालेल्या नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी अनेक विषयांना स्पर्श केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात संघटन बळकट करण्याचे निर्देश त्यांली यावेळी दिले. बैठकीला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विदर्भ संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर उपस्थित होते.
विरोधकांनी ‘संविधान बदल’चा विषय लावून धरला होता. याशिवाय, इतर मुद्यांनाही प्रभावीपणे जनतेपर्यंत नेले. हे सर्व ‘फेक नॅरेटिव्ह” असून, ते मतदारांच्या मनातून बाहेर काढण्यासाठी सत्याचा लढा उभारावा लागेल, असे आवाहन मुनगंटीवार यांनी केले.
तरच प्रभावी कामगिरी करता येईल..
लोकसभा निवडणुकीत विदर्भात भाजपला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आधी संघटन बळकट करण्यावर भर दिला जाणार आहे. विधानसभा निवडणूकीपूवीं संघटन बळकट असल्यास प्रभावी कामगिरी करता येईल, असे मत यावेळी मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. या बैठकीत विधानसभा निवडणुकीवर तसेच उमेदवारीवर कोणतीच चर्चा झाली नसल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच बूथ प्रमुख, सुपर वॉरिअर यांचा कामाचा अहवाल घ्या. ज्या प्रमुखांच्या क्षेत्रात पक्षाचे नुकसान झाले, त्यांना तातडीने काढा, नवे प्रमुखांची तातडीने नियुक्ती करा अशाही सूचना बैठकीत देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रदेश प्रभारी आढावा घेणार..
पुणे येथील बालवाडीत भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन झाले त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना संबोधित केले होते. या बैठकीचे पडसाद भाजपच्या विभागनिहाय आढावा बैठकीत उमटत आहेत. विधानसभा निवडणुकीपुर्वी संघटन तयारी व रचनेबद्दलचा आढावा खुद्द पक्षाचे प्रदेश प्रभारी व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र यादव तसेच सहप्रभारी व रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव घेणार असल्याची माहिती मिळत आहे.