नागभीड (चंद्रपूर): ब्रम्हपुरी वनविभागाअंतर्गत नागभीड वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र मिडाळा, नियतक्षेत्र मिडाळा कक्ष क्रमांक ७५६ पीएफमध्ये ४ जानेवारीला दोन नर वाघांमध्ये झुंज झाली. या झुंजीमध्ये टी -१०० नर वाघाच्या समोरील डाव्या पायाला गंभीर जखम झाली, तर दुसऱ्या अनोळखी वाघाच्या मानेवर, पाठीवर व पायावर जखमा होऊन रक्तस्त्राव होत असल्याचे दिसून आले.
त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवून वाघांना वैद्यकीय उपचारार्थ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती. १२ जानेवारीला कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११० मध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमूकडून नर वाघाला सकाळी ७.३१ वाजता डार्ट करून ८.१५ वाजताच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.
जेरबंद करण्यात आलेल्या वाघाचे वय अंदाजे १० वर्षे असून, त्याला पुढील वैद्यकीय उपचारार्थ ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटर, चंद्रपूर येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे. १० जानेवारीला टी-१०० नर वाघाने अनपेक्षितपणे कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील पारडी येथील रहिवासी गुरुदेव पुरुषोत्तम सारये यांच्यावर गट क्रमांक ७५ मध्ये हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर शेतशिवार परिसरात टी-१०० वाघाचे अस्तित्व कायम असल्याचे तसेच समोरील डाव्या पायावरील गंभीर जखमेमुळे तो शिकार करू शकत नसल्याची बाब क्षेत्रीय चमूला निदर्शनास आली. त्यामुळे रेस्क्यू ऑपरेशन राबवून दोन्ही वाघांना वैद्यकीय उपचारार्थ जेरबंद करण्याची कार्यवाही सुरू होती. अखेरीस रविवारी वनविभागाला जखमी वाघाला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे कोसंबी गवळी नियतक्षेत्रातील कक्ष क्रमांक ११० मध्ये रेस्क्यू ऑपरेशन राबवून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या चमूकडून टी-१०० नर वाघाला ७.३१ वाजता बेशुद्ध करून पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. ही कार्यवाही नागभीड (प्रा) वनपरिक्षेत्र अधिकारी अरुप कन्नमवार यांच्यासह इतर क्षेत्रीयवन कर्मचारी तसेच डॉ. रविकांत खोब्रागडे, पोलीस कॉन्स्टेबल (शूटर) अजय मराठे, बायोलॉजिस्ट राकेश अहुजा यांच्या उपस्थितीत पार पडली.