चंद्रपूर : विधानसभा निवडणुकीचे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. अशातच आता चंद्रपूर येथे महायुतीला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खंदे समर्थक अपक्ष आमदार किशोर जोरगेवार हे २३ तारखेला तुतारी हाती घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जोरगेवार हे मुंबईत शरद पवारांच्या भेटीला येणार असून सकारात्मक चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितले आहे.
२०१९ च्या निवडणुकीत चंद्रपूर विधानसभेत किशोर जोरगेवार यांनी अपक्ष निवडणूक लढवून तब्बल ७५ हजार मताधिक्यांनी विजयी मिळवला होता. जोरगेवार यांनी भाजपाचे उमेदवार नाना श्यामकुळे आणि काँग्रेस उमेदवाराचा पराभव केला होता. चंद्रपूर विधानसभेत याआधी १९६२ साली रामचंद्रराव पोटदुखे हे अपक्ष म्हणून विजयी झाले होते. त्यानंतर किशोर जोरगेवार हे दुसरे अपक्ष आमदार झाले आहेत.
मागील निवडणुकीत ते काँग्रेसकडून तिकिटासाठी आग्रही होते. मात्र, तिकिट न मिळाल्याने किशोर जोरगेवार हे अपक्ष निवडणुकीत उभे राहिले आणि मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले होते. राज्यात मविआ सरकार स्थापनेवेळी जोरगेवारांनी सरकारला पाठिंबा दिला. त्यानंतर जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्ष आमदार म्हणून त्यांना समर्थन दिले.
किशोर जोरगेवार हे सर्वसामान्य कुटुंबातून पुढे आले आहेत. जोरगेवार यांच्या आईचं नुकतेच निधन झालं असून ‘अम्मा की दुकान, अम्मा का टिफिन’ या उपक्रमाने त्या प्रसिद्ध होत्या. गरजू व्यक्तींनी दररोज त्या स्वत: तयार करून जेवण पुरवत होत्या. अत्यंत कठीण परिस्थितीत त्यांनी बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तू विकून कुटुंबाला हातभार लावला. मुलांना शिकवले, एवढेच नाही तर त्यांचा मुलगा किशोर जोरगेवार हे आमदार झाल्यानंतरही शहरातील गांधी चौकात दुकानात बसून त्यांनी लहान व्यवसाय सुरू ठेवला होता.