जळगाव : एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत हे आता स्पष्ट झालं असून स्वत: एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले पुढील १५ दिवसांत मी स्वगृही परतत आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत भावनिक वक्तव्य केलं आहे. माझ्या संकटाच्या काळात शरद पवार यांनी मला साथ दिली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे, पण आता मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, असं एकनाथ खडसे म्हणाले.
पुढे बोलताना म्हणाले की, माझी भाजपमधील जुन्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांसोबत अनेक महिन्यांपासून चर्चा सुरू होती. त्यांचं म्हणणं होतं की मी पुन्हा भाजपमध्ये यायला हवं. मात्र मी याबाबतचा निर्णय घेण्याच्या मानसिकतेत नसल्याचं त्यांना सांगितलं होतं. मात्र, मी काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यावेळी मी त्यांच्याकडे भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसेच पुढील पंधरा दिवसांच्या आत माझा भाजप प्रवेश होईल, असं खडसे यांनी सांगितलं.
निर्णयापूर्वी जयंत पाटलांशी केली चर्चा
भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेण्यापूर्वी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना या निर्णयामागील कारणे देखील सांगितली आहेत. त्यांची अनुकूलता प्राप्त झाल्यानंतरच मी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय निश्चित केला, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे.
माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर दिल्लीत होणार
नरेंद्र मोदी हे काही दिवसांत विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या उपस्थितीत एकनाथ खडसे यांचा भाजप प्रवेश होणार आहे, अशी चर्चा होती. मात्र खडसे म्हणाले, माझा पक्षप्रवेश महाराष्ट्रात नव्हे तर नवी दिल्ली येथे होणार आहे. केंद्रीय नेतृत्वाकडून जेव्हा वेळ दिली जाईल, त्यानंतर मी दिल्लीत जाऊन भाजप प्रवेश करेन, असं एकनाथ खडसे म्हणाले.