नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे पराभूत झालेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ईव्हीएमवर खापर फोडायला सूरूवात केली आहे. महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांनी निकालानंतर पत्रकार परिषद देऊन ईव्हीएममध्ये गडबडी झाल्याचा आरोप करत अनेक पुरावे सादर केले होते. यानंतर आता मविआचे नेते ईव्हीएमविरोधात आंदोलन पुकारणार असल्याची माहिती आहे. असे असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यथक्ष नाना पटोले यांनी एक मोठं विधान केले आहे. माझा ईव्हीएमवर आक्षेप नसल्याचे विधान नाना पटोलेंनी केले आहे. त्यामुळे पटोलेंच्या या विधानानंतर मविआच्या नेत्यांना धक्का बसला आहे.
काय म्हणाले नाना पटोले?
नाना पटोले पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, कोण मुख्यमंत्री ठरेल? याचा भाजपचे राष्ट्रीय नेते निर्णय घेतील. त्यामुळे त्यावर आम्ही काय बोलणार नाही. नाना पटोले पुढे ईव्हिएमवर बोलताना म्हणाले की, माझा ईव्हीएमवर मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणाली वर आक्षेप असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.
सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पारदर्शी म्हटलं आहे, याबाबत बोलताना नाना पटोले म्हणाले की,आमदार अपात्र प्रकरणाचा निर्णय 2 वर्ष लागत नाही. पण ईव्हीएमवरचा निर्णय 2 तासात लावतात यावरून ईव्हीएमवर प्रेम लक्षात येते,असा टोलाही पटोलेंनी कोर्टाला लगावला आहे. तसेच ही बाब आमच्या राष्ट्रीय नेतृत्वाने गांभिर्याने घेतली असून आज दिल्लीत केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत,असेही नाना पटोले यांनी सांगितले.
कापूस, धान, सोयाबीन खरेदी केंद्र अद्याप सुरू झाली नाही. जनतेची भीती सरकारच्या मनात नाही. लोकांच्या मतापेक्षा मशीन सत्ताधाऱ्यांना प्रिय झाली ही व्यवस्था लोकशाहीसाठी घातक आहे. या विरोधात आम्ही न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही नाना पटोलेंनी सांगितले आहे. मुनगंटीवारला काय वाटत?याबाबत मला माहिती नाही. माझा मशीनवर नाही तर निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर आक्षेप आहे. निवडणूक आयोगाच्या पारदर्शिकतेवर आम्हाला आक्षेप आहे. निवडणूक आयोग पारदर्शी नाही हा माझा आरोप आहे. असे नाना पटोले म्हणाले आहेत.