बुलढाणा : बुलढाण्यात शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराळे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचं अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी समोर आल्या.
या घटनेच्या दिवशी सकाळी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार हा तरुण मोटार सायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचं दिसून आले. विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी मुलाच्या कुटुंबीयांसोबत पोलीस ठाण्यात देखील हजर होता. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी रुपेशची चौकशी केली असता हा सर्व प्रकार उघडकीस आला. शेवटी आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात ठेवल्याचे कबुल केले.
कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आढळल्या धक्कादायक गोष्टी
दरम्यान, रुपेश वारोकार यानेच कृष्णाच्या हत्येची कबुली दिली आहे. कृष्णाचा गळा आवळला त्यानंतर हातोड्याने त्याच्या डोक्यावरही वार करण्यात आले होते. हत्येनंतर त्याचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. दुसऱ्या दिवशी एका गावकऱ्याला रानात कृष्णाचा मृतदेह आढळला. याबाबत त्यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली. कुटुंबीयांनी कृष्णाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.
मात्र, दुसऱ्याच दिवशी कृष्णाच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी स्मशानात लिंबू, हात-पाय तोडलेली बाहुली, धागे-दोरे, दारूची बाटली आणि पुजेचे साहित्य दिसले. या सर्व गोष्टी आढळून आल्याने ही हत्या अघोरी पुजेसाठी केल्याचं उघडकीस आलं. यामध्ये नरबळीचा प्रकार घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, हे नेमकं कोणी केलं याबाबतची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. हत्या करणारा आणि स्मशानात पूजा करणाऱ्यांचा काही संबंध आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत.