अकोला : अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजप नेत्याची मुलगी असलेल्या एका शिक्षक तरुणीला मुख्याध्यापकाने शरीर सुखाची मागणी केल्याची घटना घडली आहे. या घटनेनं जिल्ह्यातील शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान, अकोल्यातील जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर या पीडित शिक्षक तरुणीने आमरण उपोषण सुरू केलं आहे.
अकोट येथील शाळेतील मुख्याध्यापकानेच शिक्षिका असलेल्या तरुणीकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून शाळेचे मुख्याध्यापकी मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही या शिक्षिकेने केला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरुन या प्रकरणात मुख्याध्यापक यांच्याविरुद्ध अकोट शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत त्याच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई झाली नाही, असा आरोपही या शिक्षक तरुणीने केला आहे.
शिक्षिकेकडून आमरण उपोषण सुरू
सदर मुख्याध्यापकावर अटकेची कारवाई करत तात्काळ त्यांचे निलंबन करावे, या मागणीसाठी शिक्षिकेने आमरण उपोषण सुरू केलं आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणावर शिक्षण विभाग आणि पोलीस विभाग मौन बाळगून बसला आहे. दरम्यान, उपोषणकर्त्या शिक्षिकेविरूद्धही आरोपी शिक्षकाच्या पत्नीने ब्लॅकमेलींगची तक्रार केली आहे. त्यामुळे, या दोन्ही प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये सत्य बाहेर काढण्याचं काम अकोट पोलिसांना करावं लागणार आहे.