नागपूर : ठाणे येथे अपघात झाल्याची बतावणी करून एका ठकबाजाने आमदार कृष्णा खोपडे (Krushna Khopade) यांना आर्थिक मदत मागितली. खोपडे यांनी त्यांच्या सहकाऱ्याच्या माध्यमातून आरोपीच्या खात्यात पैसे वळते केले. मात्र, नंतर अशी कोणतीच घटना घडली नसल्याचे समोर आले. या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
प्रविण कडू (वय 22, रा. पालघर, मोकाळा) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने अशाप्रकारे इतरही नेत्यांना चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या 26 एप्रिलच्या रात्री आमदार खोपडे हे त्यांचे सहकारी अरुण हारोडे (वय 50) आणि इतर 7-8 कार्यकर्त्यांसह दुरांतोने मुंबईला जात होते. या दरम्यान त्यांच्या मोबाईलवर प्रविणचा कॉल आला. त्याने आपले नाव व पत्ता सांगून कुटुंबासह प्रवासादरम्यान त्याच्या वाहनाला ठाणे येथे अपघात झाल्याची माहिती दिली.
तसेच या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्याला रुग्णवाहिकाही मिळत नाही. परत नागपूरला परतण्यासाठी डिझेलचे पैसेही नसल्याची बतावणी करत 6 हजार रुपयांची मागणी केली.
इशारा देताच पैसे केले परत
प्रविणशी संपर्क करून पोलिसात तक्रार करण्याचा इशारा दिला असता त्याने 5 हजार रुपचे परत केले. मात्र, उर्वरित पैसे देण्यास टाळाटाळ करू लागला. हारोडे यांनी प्रकरणाची तक्रार लकडगंज पोलिसात केली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. प्रविणने अशाप्रकारे अनेकांना चुना लावल्याचे सांगण्यात येत आहे. लवकरच एक पथक प्रविणला अटक करण्यासाठी पालघरला रवाना होणार आहे.