अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : गतवर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना कापूस आणि सोयाबीन अत्यल्प भावात विक्री करावा लागला होता. त्याचा मोठा आर्थिक फटका घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला यामुळे शासनाने भाव फरक म्हणून हेक्टरी ₹ 5,000 हजारांची मदत जाहीर केली. परंतु शासनाच्या कामचुकार अधिकाऱ्यांनी घाटंजी तालुक्यातील किमान अर्ध्या शेतकऱ्यांची नांवे शासनाने प्रसिद्ध केलेल्या यादीतून वगळले आहे.
विशेष म्हणजे शेतकऱ्यांचे सर्व रेकॉर्ड शासना जवळ असतांना बँकेचे खाते, सातबारा उतारा, आधार लिंक उपलब्ध आहे. तरी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडून अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करायला सांगितले जात आहे. हे अतिशय निंदनीय असून केवळ तुटपुंज्या पैशासाठी शेतकऱ्यांचा छळ करणे सुरू आहे. याचा निषेध करण्यासाठी आज घाटंजी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी धडकले होते.
सदर विषयाचे निवेदन घाटंजीचे नायब तहसीलदार रमेश मेंढे यांना देण्यात आले. आठ दिवसात महसूल आणि कृषी विभागाने एकत्र बसून यादिचा घोळ संपवावा व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी शेतकरी नेते तथा घाटंजी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष मोरेश्वर वातीले यांनी केले. निवेदन देतांना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिकराव मेश्राम, अनंतराव चौधरी, अरविंद चौधरी, अरविंद जाधव, पांडुरंग मासुलकर,नंदु तुमराम, विष्णू धुर्वे, मधुकर घोडाम, सुनिल कोरवते, उज्वल जिवतोडे, रविंद्र मोहजे या सह शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते.