अमरावती: आपल्या कारमधून तब्बल १ किलो सोने असलेली बॅग लंपास करण्यात आल्याची तक्रार अमरावती येथील रहिवासी एका ३३ वर्षीय सुवर्णकाराने २७ जुलै रोजी परतवाडा पोलीस ठाण्यात दाखल केली होती. त्या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर २ ऑगस्ट रोजी ती चोरी झालीच नसल्याचे उघड करण्यात स्थानिक गुन्हे शाखा व परतवाडा पोलिसांच्या संयुक्त पथकाला यश मिळाले. सुवर्णकाराने सोने चोरीचा बनाव रचून खोटी तक्रार दिल्याचे तपासात स्पष्ट झाले. त्यामुळे तक्रारकर्ता सुवर्णकारच आता आरोपीच्या पिंजऱ्यात उभा झाला आहे.
कोरोना काळात झालेला तोटा व अन्य व्यापाऱ्यांची देणी देण्यासाठी अवधी मिळावा म्हणून सदर सुवर्णकाराने चोरीचा बनाव रचल्याची माहिती पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी दिली. सदर सुवर्णकार काही सोने सोबत घेऊन अचलपूर-परतवाड्याकडे निघाला होता. त्यातील काही सोने त्याने आसेगाव व परतवाड्याला विकले. उरलेले सोने पत्नीकडे दिल्यावर त्याने अमरावती-परतवाडा मार्गावरील एका पेट्रोलपंपाजवळ आपली एक किलो सोने असलेली बॅग कारमधून चोरीला गेल्याच्या नाटकाला सुरुवात केली.
डायल ११२ ला कॉल करून त्याने माहिती दिल्यानंतर परतवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. एक किलो सोने किमान ६० ते ७० लाखांचे असल्याने स्थानिक गुन्हे शाखेनेही तपास आरंभला. तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेची तीन व परतवाडा पोलिसांची दोन पथके गठित करण्यात आली होती. तपासात सदर सुवर्णकार हा अमरावतीचा रहिवाशी असल्याने रस्ता विसरलो, ही थाप पोलिसांच्या पचनी पडली नाही. कारमध्ये नेमके किती सोने होते, तो निश्चितपणे सांगू शकला नाही.
कार बंद पडल्याने आपण बॅटरी टर्मिनल चावीने घासल्याचे त्याने सांगितले होते. ती बाबदेखील खोटी निघाली. दरम्यान, त्या कालावधीत कुणीच वाहनधारक वा पादचारी तेथून गेला नसल्याची बाबदेखील संशयास्पद होती. त्यामुळे तक्रार चौकशीत ठेऊन स्थानिक गुन्हे शाखा व परतवाडा पोलिसांनी सुवर्णकाराची उलटतपासणी घेतली. चार दिवसांच्या चौकशीनंतर २ ऑगस्ट रोजी त्याने चोरीचा बनाव रचल्याची कबुली दिली.