नागपूर : ‘सगेसोयऱ्यांसंदर्भात निर्णय घेणं राज्य सरकारच्या हातात नाही. आपली पितृसत्ताक संस्कृती आहे, त्यामुळे मुलाला वडिलांची जात लागते आईची नाही’, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी दिली आहे. मनोज जरांगे यांनी सगेसोयऱ्यांना देखील कुणबी प्रमाणपत्र मिळायला हवं अशी मागणी केलीये. त्याच पार्श्वभूमीवर सरकारमधील मंत्री, नेते त्यावर मत व्यक्त करत आहेत.
ज्या मागण्या मनोज जरांगे यांनी केल्या आहेत, ते सगळे जुनेच नियम आहेत. 12 वी पर्यंत मुलींना शिक्षण मोफत आहे, पुढच्या शिक्षणासाठी देखील मदत मिळते, असे देखील बबनराव तायवाडे यांनी म्हटले आहे. जोपर्यंत सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत शिक्षण मोफत देण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केलीये. तसेच शासन भरतीमध्ये मराठा समाजाच्या जागा रिक्त ठेवण्याची मागणी देखील यावेळी मनोज जरांगे यांनी केली.
त्यावर राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी प्रतिक्रिया दिलीये. मनोज जरांगे यांच्या काही मागण्या होत्या, त्या मान्य झाल्याचे चित्र सध्या आहे, त्यामुळे रात्रभरात हे आंदोलन संपेल अशी अपेक्षा देखील बबनराव तायवाडे यांनी व्यक्त केलीये.