अयनुद्दीन सोलंकी
घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी शहरातील ईस्तारी नगर येथे पोलिसांनी जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या कारवाईत आरोपीकडून ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी (दि. २१) करण्यात आली. याप्रकरणी ९ जणांविरुद्ध घाटंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उप निरीक्षक राजेश पंडित यांनी फिर्याद दिली आहे.
संतोष दामोदर वराडे (वय ४९), राजेश रामचंद्र राठोड (वय ४२), सुनिल पुंडलिक वेले (वय ५९), संदीप झिबलाजी धांदे (वय ४९), रवि महादेव बिसमोरे (वय ४३), सुनील कवडू इमडे (वय ४९, सर्व रा. इस्तारी नगर घाटंजी), विशाल पांडुरंग साबापूरे (वय ४७, जेसीस काॅलनी, घाटंजी), प्रविण लक्ष्मण डोनाडकर (वय ५७, नेहरु नगर, घाटंजी), व चंदन किसनराव टोंडरे (वय ३०, रा. भारी ता. यवतमाळ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटंजी शहरातील ईस्तारी नगर येथे संतोष वराडे यांच्या घरासमोर काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची गोपनीय माहिती घाटंजी पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे घाटंजी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर, पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित व पोलिस पथक खाजगी वाहनाने जुगार खेळत असलेल्या ठिकाणी दाखल झाले.
यावेळी संतोष वराडे यांच्या घरासमोर काही व्यक्ती 52 पत्त्यांचा एक्का बादशाह नावाचा हार जितचा जुगार खेळत असल्याचे आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी ९ आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून ३ लाख ६१ हजार ६०० रोख रक्कम, मोटार सायकल असा ४ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदरची कारवाई घाटंजी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक राजेश पंडित व पोलिस पथकाने केली.