वर्धा: नागा साधूच्या वेशात गुजरात राज्यांमधून वर्धा जिल्ह्यात येऊन वाटसरूंना लुटणारी टोळी पकडण्यात वर्धा येथील गुन्हे अन्वेषण विभागाला यश मिळाले आहे. हिंगणघाट येथे घडलेला गुन्हा या टोळीने कबूल केला असून, त्यांच्याकडून आठ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने विदर्भाच्या इतरही जिल्ह्यात गुन्हे केले असावेत, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.
साहेबराव बापुराव झोटिंग (५५, रा. अजनगाव, ता. हिंगणघाट, जि. वर्धा) हे हिंगणघाट येथील किरण वादाफळे यांच्याकडून ५० हजार रुपये उसनवारी घेऊन ३ ऑगस्ट रोजी मुलासोबत मोटरसायकलने गावाकडे जात होते. हिंगणघाट येथील वणा नदीच्या पुलाजवळ अज्ञात नागा साधूंनी त्यांना थांबवत नागा साधू आले आहे व ते गाडीत आहेत. आपण नागा साधूंचे दर्शन घ्या, असे म्हणून साहेबराव यांना उभ्या असलेल्या कारजवळ नेण्यात आले. तेथे साहेबराव यांच्या पँटच्या खिशातील नगदी ५० हजार रुपये जबरीने हिसकावून नेले. तक्रारीवरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा हा अंत्यत क्लिष्ट व गंभीर स्वरुपाचा असल्याने व कुठलाही पुराव उपलब्ध नसताना स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांनी या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला. गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली चारचाकी गाडी निष्पन्न करून गुन्ह्यातील आरोपी हे चारचाकी गाडीने यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा, नेर येथे फिरत आहे, अशी माहिती मिळाली.
वर्धा स्थानिक गुन्हे शाखाचे पथक त्यांच्या मागावर गेले असता आरोपी हे चारचाकी वाहनाने यवतमाळकडून वर्धा शहराकडे येत होते. चारचाकी वाहनात साधूचे वेशात असलेले इसम आढळून आले. हुसनापूर टोल प्लाझा येथे नाकेबंदी करून जिजे ०१ आरएक्स ०७४५ क्रमांकाचे वाहन पोलिसांनी अडविले. यावेळी आरोपी करणनाथ सुरूमनाथ मदारी (२२), कैलासनाथ सुरेशनाथ मदारी (२७, दोन्ही रा. सरोस्वनी, ता. मेमदावाज, जि. खेडा, गुजरात), गणेशनाथ बाबुनाथ मदारी (१८, रा. कोठीपुरा, ता. मेमदावाज, जि. खेडा, गुजरात), प्रताभनाथ रघुनाथ मदारी (२८, रा. हलदरावास, ता. मेमदावाज, जि. खेडा, गुजरात), धिरूनाथ सरकारनाथ मदारी (२६, रा. कपडवंच, जि. खेडा, गुजरात) यांना ताब्यात घेऊन आरोपींना हिंगणघाट पोलीस ठाण्यात नेवून घडलेल्या गुन्ह्याबाबत चौकशी करण्यात आली.
गुन्हा केल्याचे कबुल केल्यानंतर आरोपींच्या ताब्यातून जिजे ०१-आरएक्स-०७४५, लूटमार केलेले ५० हजार रुपये, ४१ हजार रुपये किमतीचे पाच मोबाइल असा एकूण आठ लाख ९१ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक यांचे निर्देशानुसार हिंगणघाट पोलीस निरीक्षक मनोज गभने यांचे मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सलाम कुरेशी, पोलीस अंमलदार सचिन इंगोले, प्रमोद पिसे, रामकिसन इप्पर, अरविंद इंगोले, अक्षय राउत, प्रशांत ठोंबरे, राहुल साठे, अमोल तिजारे, विजय काळे आदींनी केली.