नागपूर : राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढताना दिसत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. त्यातच नागपुरात एक धक्कादायक घटना घडली. एका आजारी महिलेवर सामूहिक अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली.
तिरोड्याची राहणारी 48 वर्षीय पीडित महिला पतीसोबत राहते. काही दिवसांपासून ती आजारी होती. तिला तिरोडा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार घेतल्यानंतर तिला रुग्णालयातून सोडण्यात आले होते. पती भांडण करतो म्हणून ती स्वतःच्या घरी न जाता मध्यप्रदेशात राहणाऱ्या बहिणीकडे जाण्यासाठी तिरोडा रेल्वेस्थानकावर गेली. ती रेल्वेगाडीच्या प्रतीक्षेत होती. जवळच एक 40 वर्षीय व्यक्ती बसला होता.
आरोपीने तिची आस्थेने विचारपूस केली. सहप्रवासी म्हणून तिनेही मध्यप्रदेशात बहिणीकडे जात असल्याचे सांगितले. तिरोडा स्थानकाहून कटंगीला गाडी गेल्यावर दुचाकीवर तुला सोडून देतो, अशी त्याने थाप मारली. तिने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्याच्या दुचाकीवर बसून निघाली. त्यावेळी रात्र झाली होती. काही अंतर गेल्यानंतर त्याने तिच्यावर अत्याचार केला. एवढ्यावरच आरोपी थांबला नाही तर त्याने मित्रालाही बोलावून घेतले. त्यानेही पीडितेवर अत्याचार केला. त्यानंतर दोन्ही आरोपी दुचाकीने निघून गेले.
दरम्यान, ही भयभीत झालेली महिला स्थानिकांना दिसली. ती खूपच घाबरलेली असल्याने तिला काहीच सुचत नव्हते. त्यानंतर तिची विचारपूस केली असता तिने घडला प्रकार सांगितला. स्थानिकांनी पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.