गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात गेल्या महिन्यामध्ये एका गावात पंधरा दिवसात पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. आता या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आलीय. या घटनेत एकाच कुटुंबातील आई-वडील, मुलगा-मुलगी आणि मावशी यांचा मृत्यू झाला होता. गडचिरोली पोलिसांनी कसून चौकशी केल्यानंतर पाचही जणांची विष देऊन हत्या केल्याचं उघड झालं आहे. अहेरी तालुक्यातील महागाव बुद्रुक येथे ही घटना घडली होती. पोलिसांनी दोन महिला आरोपींना अटक केली आहे.
या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, अहेरी तालुक्यातील महागाव येथे 22 सप्टेंबर रोजी एका कुटुंबातील विजया या 43 वर्षीय महिला डोकेदुखी आणि थकव्यामुळे आजारी पडल्या. त्यांचे पती शंकर हे त्यांना गाडीतून रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन चंद्रपूरला गेले. नंतर पुढील उपचारासाठी नागपूरला गेले. मात्र, तिथे तेही आजारी पडले. 26 सप्टेंबर रोजी रात्री शंकर कुंभारे तर 27 सप्टेंबर रोजी सकाळी विजया यांचा मृत्यू झाला. दरम्यान या दोघांच्या अंत्यविधीसाठी विवाहित मी मुलगी कोमल ही माहेरी आली होती. कोमलचाही 08 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. तसेच सिरोचा येथे पोस्टमन म्हणून कार्यरत असलेला शंकर कुंभारे यांचा मुलगा रोशन कुंभारे याचाही नागपुरात उपचार सुरू असताना 15 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला. कुंभारे दाम्पत्याच्या अंत्यविधीसाठी महागाव येथे आलेल्या आनंदा उराडे यांचाही 14 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता.
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कसून चौकशी करण्याचे आदेश दिले. सखोल तपासानंतर या गुढ मृत्यू प्रकरणाचा उलगडा झाला. प्रेम विवाह करून घरात आलेल्या सून संघमित्रा कुंभारे यांचे घरात सासू सासऱ्या सोबत कायम वाद व्हायचे. तसेच दुसरी आरोपी रोजा रामटेके हीचा संपत्तीच्या हिस्स्यातून वाद होता. यातूनच या दोघींनी तेलंगणात जाऊन विष आणले. मृत पावलेल्या सर्व व्यक्तींच्या जेवणात हे विष खाण्यास दिले. या विषाचा परिणाम हळू हळू होऊन सर्व व्यक्तींचा एकापाठोपाठ आजारी पडून मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत या दोघींनी गुन्हा कबूल केला आहे.
हेही वाचा:
कामाची गोष्ट: तुम्हाला सर्व ई-मेल आपोआप फॉरवर्ड करायचेत, मग अशी करा जीमेलमध्ये सेटिंग
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोदी सरकारची भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांनी केली वाढ