गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गावालगत असलेल्या शेतातल्या झोपडीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे दोघेही एकाच दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. लग्नाला विरोध झाल्याने या प्रेमी युगुलाने धक्कादायक पाऊस उचललं असल्याचे बोलले जात आहे.
जयदेब मिलन मंडल (वय-20, रा. लक्ष्मीपूर), अमेला अमित रॉय (वय 18 रा. विजयनगर) अशी त्या तरुण तरुणीची नावं आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवार (दि. 06 ऑक्टोबर) रोजी सकाळी लक्ष्मीपूर गावालगत असलेल्या धानाच्या शेतात गेलेल्या काही लोकांना एका शेतातील झोपडीत जयदेब मंडल आणि अमेला रॉय या दोघांनी एकाच दोरीने गळफास घेतल्याचे दिसून आले. त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती गावातील लोकांना दिली. त्यांनतर गावकऱ्यांनी घटनास्थळी एकच गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच मुलचेरा पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. दोघांच्या मृतदेहाचे मुलचेराच्या ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मृत तरुणी अमेला ही विजयनगर येथील रहिवासी असून ती बारावीत शिकत होती. तर जयदेब मंडल हा बारावी नंतर शिक्षण घेतला नाही. हे दोघेही गांधीनगरच्या शाळेत शिक्षण घेतले आहेत. त्या दोघांचे वर्ग वेगवेगळे असले तरी शाळा एकच होती. तिथेच त्यांची जवळीक वाढली होती. शनिवारच्या मध्यरात्री अमेला घरून बाहेर पडली. विजयनगर ते लक्ष्मीपूर या दोन गावातील अंतर जवळपास 5 ते 6 किलोमीटर असून लक्ष्मीपूर येथील शेतातील एका झोपडीत त्यांनी गळफास घेत जीवनयात्रा संपवली.
या दोघांनी आत्महत्या का केली, यामागील नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. मात्र, जयदेब आणि अमेला या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.