भूगाव : कामठी तालुक्यातील भूगाव येथे सिलिंडरचा स्फोट झाल्याने चार घरे जळाली. यात जीवितहानी टळली असली तरी संसारोपयोगी साहित्य जळून स्वाहा झाले. एवढी मोठी घटना भूगावात पहिल्यांदाच ४ जून रोजी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, उषा नाना आंबोलडुके या मंगळवारी घरी असताना अचानक शॉर्टसर्किट झाला. गॅस सुरू असल्याने मोठा स्फोट झाला. उषा आंबीलडुके या त्वरित घराबाहेर पडल्यामुळे जीवितहानी झाली नाही. परंतु घरातील पैसे, धान्य व इतर वस्तू पूर्णतः जळून खाक झाल्या. त्यांच्या घरालगत बबलू आंबीलडुके, ओमलता आंबीलडुके, उषा रमेश आंबीलडुके यांचीही घरे जळाल्याने जीवनाश्यक वस्तू, पैसे, अन्नधान्य, तेल जळाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी नरेंद्र बारई, गजानन वंजारी यांनी प्रयत्न केले. परंतु,ते अपयशी ठरले.
आग विझत नसल्याने हल्दीराम कंपनी, एनटीपीसी, नगरपंचायत मौदाच्या अग्निशमन विभागाला पोलीस नाईक डोईफोडे यांच्याकडून माहिती देण्यात आली. त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून आग विझविली. तलाठी कापगते व पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. लेखी तक्रार दिल्यावर नुकसानीचा अहवाल स्पष्ट करू, असे पोलिसांनी सांगितले. याप्रसंगी भूगावचे सरपंच नितेश घुबडे, उपसरपंच फुलचंद आंबीलडुके व पोलीस अधिकारी उपस्थित होते.