अमरावती : अमरावतीमध्ये भरधाव बसने चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. शहरातील सायन्स कोर मैदानासमोर ही घटना घडली असून या अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हि घटना आज सकाळी (दि. १४) घडली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती शहरातील सायन्स कोर मैदानासमोर सिटी बसने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये ९ वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तिन्ही महिलांचा समावेश आहे. या अपघातानंतर संतप्त झालेल्या जमावाने बसची तोडफोड केली आहे.
अपघाताची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. जखमींवर उपचार सुरू असून तिन्ही व्यक्तींची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.