अमरावती: अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून, त्यांचे अश्लील व्हिडीओ बनवून लैंगिक शोषण करणाऱ्या मोहम्मद आयाज आणि त्याच्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. हे प्रकरण केवळ एका गुन्ह्यापुरते मर्यादित नसून, सोशल मीडिया आणि डिजिटल ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून तरुणींना जाळ्यात ओढण्यात आले होते. धक्कादायक म्हणजे, आयाज हा एमआयएम (MIM) पक्षाचा माजी पदाधिकारी असल्याचेही समोर आले आहे, ज्यामुळे या प्रकरणाला राजकीय वळणही मिळाले आहे.

हे प्रकरण तेव्हा समोर आले जेव्हा भाजप खासदार अनिल बोंडे यांनी मुख्य आरोपी मोहम्मद आयाजवर गंभीर आरोप केले. आयाजने शेकडो तरुणींचे शोषण केल्याचा दावा करण्यात आला होता. तपासाअंती पोलिसांनी आयाजसह त्याचे साथीदार उजेर खान, तरबेज खान आणि मोहम्मद साद यांना अटक केली आहे.

आरोपी तरुणींशी मैत्री करून त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर त्यांचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ काढून ते मित्रांना पाठवायचा. पोलिसांच्या हाती आतापर्यंत 18 व्हिडीओ आणि 39 अश्लील फोटो लागले आहेत. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, पीडितांमध्ये काही अल्पवयीन मुलींचाही समावेश असल्याचे समजते.
दरम्यान, प्रशासनाने मोठी कारवाई करत मुख्य आरोपी मोहम्मद आयाजच्या घरातील अतिक्रमित भागावर बुलडोझर फिरवला आहे. गुन्हेगारांचे मनोबल खच्ची करण्यासाठी सरकारने हे कठोर पाऊल उचलले आहे. या प्रकरणी महिला आयोगाने एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली आहे.







