अयनुद्दीन सोलंकी / घाटंजी, (यवतमाळ) : आर्णी केळापूरचे माजी आमदार राजू तोडसाम यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राजू तोडसाम हे भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचा पराभव करत निवडून आले होते.
दरम्यान, राजू तोडसाम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बी.आर.एस. (तेलंगाणा) पक्षात प्रवेश केला. सद्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असताना माजी आमदार राजू तोडसाम यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी राजू तोडसाम यांनाच मिळेल, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
एकंदरीत भाजपकडून राजू तोडसाम यांना आर्णी केळापूर विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी मिळाल्यास ते निवडून येतील, असा राजकीय अंदाज वर्तविण्यात येत आहे. दरम्यान, माजी आमदार राजू तोडसाम हे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचे समर्थक आहेत.