लातूर : राज्यात आधीच बदलापूर प्रकरण ताज असतांना राज्य आता अजून एका घटनेने हादरले आहे. लातूर जिल्ह्यातल्या चाकूर तालुक्यात एका ४ वर्षांच्या चिमुकलीसोबत लैंगिक गैरवर्तन करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे संतापाची लाट उसळली असून या प्रकरणी चाकूर पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला पोलिसांनी तात्काळ अटक केल्याची माहिती मिळत आहे.
अकोल्यात अश्लिल व्हिडिओ दाखवत ६ मुलींचा लैगिंक छळ..
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यामध्ये हा संतापजनक प्रकार समोर आला आहे. काजीखेड येथे जिल्हा परिषदेच्या उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने अश्लिल व्हिडिओ दाखवत सहा विद्यार्थीनींचा छळ केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळजनक उडाली आहे. याप्रकाराने जिल्हाभरात सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरु?
मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषदच्या उच्च माध्यमिक शाळेतील प्रमोद सरदार नामक शिक्षकाने मुलींच्या असहाय्यतेचा फायदा घेत आठव्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनींना अश्लिल व्हिडिओ दाखवत त्यांचा विनयभंग केल्याचा आरोप या शिक्षकावर आहे. चित्रफित दाखवित असताना त्याने मुलींना वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले. हा प्रकार मागील चार महिन्यांपासून सुरू असल्याचा आरोप विद्यार्थीनींनी या शिक्षकांवर केला आहे.
मंगळवारी(दि. २०) पीडित विद्यार्थिनींनी या घटनेबाबत पालकांना सांगितल्यानंतर त्यांना एकच धक्का बसला. त्यानंतर संतप्त पालकांनी उरळ पोलिसांकडे धाव घेत शिक्षकांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी उरळ पोलिसांनी शिक्षकाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून विद्यार्थिनीचा विनयभंग करणारा शिक्षक प्रमोद सरदार याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.