वरूड (अमरावती): सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाल्यावर त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यातून शारीरिक संबंध प्रस्थापित झाल्याने एका अल्पवयीन मुलीला गर्भधारणा झाली. ही घटना वरूड ठाण्याच्या हद्दीत सोमवार, ३० सप्टेंबर रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
विनय (२१, रा. मांगोना, मध्यप्रदेश) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित १७ वर्षीय मुलगी व विनयची सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ओळख झाली. ओळखीचे रुपांतर मैत्रित झाल्यावर त्यांचे प्रेमसूत जुळले. त्यानंतर ते दोघे एकमेकांना बाहेर भेटू लागले. ती नेहमी विनयला भेटायला त्याच्या घरीसुद्धा जात होती. या काळात विनयने तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान, २९ सप्टेंबर रोजी पीडित मुलीच्या पोटात दुखायला लागले. त्यामुळे आई व आजीने तिला रुग्णालयात नेले. त्यावेळी तेथील डॉक्टरांनी सोनोग्राफी करायला सांगितले. त्यानुसार सोनोग्राफी केल्यावर ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी तिच्या आई व आजीला सांगितले. ती अल्पवयीन असल्याने संबंधित डॉक्टरांनी याबाबत वरूड पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालय गाठून पीडित मुलीचा जबाब नोंदविला.