बुलढाणा: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांच्यावर शेतजमीन बळकावल्याप्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड यांच्यासह त्यांचा मुलगा मृतुंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे आणि ज्ञानेश्वर वाघ यांच्यावर देखील गुन्हा दाखल झाला आहे. मोताळा येथील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाने आदेश दिले आहेत.
मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी बुधवारी 28 फेब्रुवारीला रात्री उशिरा ही कारवाई केली. यापूर्वी मोताळा न्यायालयाने 17 फेब्रुवारी रोजी गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि आणखी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. मात्र, बोराखेडी पोलिसानी टाळाटाळ केली. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय (नागपूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे.
फिर्यादीनुसार, बुलढाण्यातील मोताळा तालुक्यातील राजूर गावात त्यांची दीड एकर शेती आहे. आमदार संजय गायकवाड यांनी 21 जुलै 2021 रोजी या जमिनीवर अतिक्रमण केले. त्याठिकाणी त्यांनी अवैध फार्म हाऊस बांधले असून फिर्यादीने आक्षेप घेतला असता त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या. यावर फिर्यादी यांनी 12 ऑगस्ट 2021 रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु, पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही.
त्यानंतर फिर्यादी यांनी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 197 च्या अनु. 156 (3) नुसार कारवाईचे आदेश17 फेब्रुवारी रोजी दिले. मात्र, कारवाई न झाल्याने फिर्यादी यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी दाखवली. यामुळे अखेर आमदार गायकवाड, मृत्युंजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.