चिमूर (चंद्रपूर): चिमूर तालुक्यातील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना आरोपींनी फूस लावून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मुलीच्या सोनोग्राफीमधून ६ सप्टेंबर रोजी उघडकीस आली. सोनोग्राफीमध्ये पीडितेला सात महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची तक्रार चिमूर पोलीस स्टेशन येथे करण्यात आली. पोलिसांनी यासंदर्भात चार आरोपींविरुद्ध भारतीय न्यायसंहिता, पॉक्सो व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शनिवारी गुन्हे दाखल केले. याप्रकरणातील एका आरोपीला अटक केली असून, तीन आरोपी पसार झाले.
अल्पवयीन मुलीचे आई- वडील घरी नसताना नातेसंबंधातील एका युवकाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. काही दिवसांनंतर इतर तीन युवकांनी वेगवेगळ्या दिवशी पीडित मुलीवर अत्याचार केला. काही महिन्यांनंतर मुलीच्या हालचालीवरून आईला संशय आल्याने चिमूर येथे दवाखान्यात नेले. यावेळी डॉक्टरांनी काढलेल्या सोनोग्राफीमध्ये अल्पवयीन मुलीला सात महिन्यांची गर्भधारणा झाल्याचे निदर्शनास आले, त्यामुळे पीडित मुलीचे पालक हादरून गेले. मुलीला विश्वासात घेऊन तत्काळ चिमूर पोलीस स्टेशन गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दिली.
पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन चार युवकांविरोधात भारतीय न्यायसंहिता, पोक्सो व अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद केला. पोलिसांनी नातेसंबंधातील एका आरोपीला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. अन्य तीन युवक पसार झाले असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत.