यवतमाळ : यवतमाळमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग मनात धरत एका दारुड्या पित्याने आपल्या तीन वर्षाच्या बाळालाच तेलंगणात विकल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना यवतमाळ जिल्ह्यातील कोपरा गावात घडली आहे.
याप्रकरणी आर्णी पोलिसांनी आरोपी बापावर गुन्हा दाखल केला असून तेलंगणा येथून पाच जणांना अटक केली आहे. श्रावण देवकर, चंद्रभान देवकर, कैलास गायकवाड, बाल्या गोडबे, अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या घटनेची तक्रार पुष्पा देवकर यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, फिर्यादी पुष्पा श्रावण देवकर (वय २७) आर्णी तालुक्यातील कोपरा येथील रहिवासी आहेत. पतीसोबत किरकोळ वाद झाल्याने तीन दिवसांपूर्वी फिर्यादी महिला वर्धा येथे माहेरी निघून गेली होती. ४ जानेवारी रोजी महिला परत पतीच्या घरी आली. यावेळी तिला आपले बाळ दिसून आले नाही.
दिवसभर ती बाळाचा शोधाशोध घेत राहिली. अखेर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आपल्या बाळाला पतीनेच विकले असल्याची माहिती फिर्यादी महिलेला मिळाली. यानंतर संबंधित महिलेने तत्काळ आर्णी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली.
त्यांनी तत्काळ आपले पथक पाठवून तिच्या पतीला ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपीने तीन वर्षीय बाळाला तेलंगणात विकल्याची कबूली दिली. यानंतर पोलिसांनी तातडीने तेलंगणा येथील निर्मल गाव गाठून बाळाची सुटका केली. याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.