वाशिम: आम्ही कर्जमाफीच्या आशेवर होतो. पण आता सरकार काहीच करणार नाही, हे स्पष्ट झाल्याने आमचा मोठा भ्रमनिरास झाला आहे. कर्जफेडीसाठी माझे अवयव विकण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नाही, असे म्हणत वाशिमच्या बाजारात सतीश इढोळे हे गळ्यात अवयव विक्रीचा फलक अडकवून उभा होते.
राज्याची आर्थिक स्थिती पाहता कर्जमाफी करणे यावर्षी तरी शक्य नाही, असे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केल्यानंतर कर्जमाफीकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. त्यातूनच नैराश्येपोटी वाशिम जिल्ह्यातील इढोळे या शेतकरी कटुंबाने अवयव विक्रीस काढले आहेत. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
सतीश इढोळे हे वाशिम जिल्ह्यातील शेतकरी आहे. ते अडोळी गावात राहतात. त्यांची जेमतेम दोन एकर जमीन आहे. त्यांच्यावर चार लाखाचं पीक कर्ज आहे. त्याचे हप्तेही थकले आहेत. त्यामुळे व्याजही वाढलं आहे. त्यामुळे सतीश यांनी कर्जफेडीसाठी हा विदारक निर्णय घेतला आहे. शेतीसाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कोणतेही मार्ग उरले नाहीत. त्यामुळे त्यांनी स्वतःसह पत्नी आणि मुलांचे अवयव विक्रीसाठी काढले आहे. मंगळवारी सकाळी वाशिमच्या मुख्य बाजारात अंगावर अवयवांचे दर लिहिलेले फलक लावून ते उभे होते. त्यात त्यांनी किडनी ७५००० रुपये, यकृत ९०,००० रुपये, डोळे २५,००० रुपये, असे दर लावले होते.
इढोळे यांच्याकडे फक्त दोन एकर शेती आहे. सततच्या नापिकीमुळे उत्पन्न तर सोडाच, पण लागवडीचा खर्चही निघत नाही. त्यात कर्जाचा डोंगर वाढत असल्याने आता शेतीतून मार्ग निघणे अशक्य झाल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीत शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले होते. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सरकारकडून कर्जमाफी शक्य नाही. शेतकऱ्यांनी कर्ज फेडावे,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे आमच्या पायाखालची जमीन सरकली आहे, असे ते म्हणाले. आमच्याकडे कर्ज फेडण्यासाठी पैसे नाहीत. सरकारने आमची किडनी, लिव्हर, डोळे विकत घ्यावेत, असे आवाहन इढोळे यांनी सरकारला केले आहे.