ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : मोहफुल वेचण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून असलेल्या वाघाने हल्ला करत ठार केले. ही घटना शुक्रवारी सकाळच्या सुमारास ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव बिटातील कक्ष क्र. ११३८ जंगल परिसरात घडली. मनोहर सखाराम चौधरी (५०, रा. आवळगाव) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सध्या मोहफुल वेचण्याचा हंगाम सुरू असल्याने पहाटेच शेतकरी शेतशिवारात मोहफुल वेचण्यासाठी जातात. आवळगाव बिटातील कक्ष क्रमांक ११३८ मध्ये मनोहर चौधरी हे मोहफुल वेचण्यासाठी पहाटेच्या सुमारास एकटेच गेले होते. यावेळी दबा धरून झुडपात लपून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला करून ठार केले. या घटनेची माहिती मिळताच वनपरिक्षेत्राधिकारी आर. डी. शेंडे व मेंडकी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रह्मपुरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
वनपरिक्षेत्राधिकारी शेंडे यांनीं चौधरी कुटुंबीयांना ५० हजार रुपये तातडीची मदत दिली. या घटनेमुळे परिसरात वाघाची दहशत निर्माण झाली आहे. वनविभागाने गस्त वाढवून वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.