मुंबई : राज्यातील प्रशासकीय अधिकारी राजकारणात उतरल्याची अनेक उदाहरणे असताना मंत्रालयातील आणखी एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने मंगळवारी राजकारणाची वाट धरली. मंत्रालयात ३ दशकांहून अधिक काळ सेवा बजावत सहसचिव (गृह) पदावर पोहोचलेल्या सिद्धार्थ खरात यांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर या अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार आहेत.
‘मातोश्री’ येथे झालेल्या पक्ष प्रवेशावेळी शिवसेनेचे (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खरात यांच्या हातात शिवबंधन बांधून त्यांना प्रवेश दिला. खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत, बुलडाणा जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते प्रा. नरेंद्र खेडेकर, आशिष रहाटे व जिल्ह्यातील शेकडो शिवसैनिक यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
खरात यांनी उच्च व तंत्र शिक्षण, ग्राम विकास तसेच गृह विभागामध्ये सहसचिव पदावर काम केले असून अनेक कॅबिनेट, राज्यमंत्री तसेच केंद्रीय राज्यमंत्र्यांकडे खासगी सचिव म्हणून सेवा बजावली आहे. खरात हे बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्याचे रहिवासी असून त्यांनी सिंदखेड राजा, देऊळगाव राजा, लोणार, मेहकर व चिखली तालुक्यांत दुधाळ गायींचे वाटप करून या परिसरात दूध संकलन केंद्रेही उभारली आहेत.
मेहकर मतदारसंघ गेल्या ३० वर्षांपासून प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वाखालीच आहे. खरात यांच्या पक्षप्रवेशाने मेहकर-लोणार मतदारसंघाच्या विकासाला चालना मिळेल. शेतकरी – शेतमजूर – बेरोजगार यांचे प्रश्न सुटण्यास मदत होईल आणि बुलडाणा जिल्ह्याची सामाजिक, राजकीय समीकरणे बदलतील, अशी भावना पक्ष प्रवेशावेळी व्यक्त करण्यात आली.