नागपूर : नागपूर शहरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पैशाच्या वादातून लहान भावाने मोठ्या भावाची हत्या केली आहे. एवढच नाही तर भावाचा मृतदेह जमिनीत पुरला. तब्बल ७ महिन्यानंतर कोराडी पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला आहे. विलास हिंगणकर असं मृत व्यक्तीचं नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी लहान भाऊ चंदन हिंगणकर आणि साथीदार ट्रकचालक मनोहर दुधभरवे या आरोपींना अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, मृत विलास आणि आरोपी चंदन हिंगनकर याचा ट्रक भाड्याने देण्याचा व्यवसाय होता. मृत विलासला दारुचे व्यसन असल्याने त्याचे व्यवसायाकडे लक्ष नव्हते. याशिवाय तो पैशांचा हिशेब देखील देत नव्हता. काही दिवसांपूर्वी विलासची पत्नी देखील घर सोडून गेली होती. त्यामुळे विलास आणखीच दारुच्या आहारी गेला होता. यामुळे व्यवसायात नुकसान झालं. त्यामुळे आरोपी लहान भाऊ अडचणीत आला होता.
सतत समजून सांगूनही विलास दारूचे व्यसन सोडायला तयार नव्हता. यामुळे आरोपी चंदन याने त्याला संपवायचा कट रचला. ७ महिन्यांपूर्वी आरोपी चंदनने ट्रकचालक मनोहर दुधभरवे याच्या मदतीने विलासची हत्या केली. एवढचं नाही तर हत्येनंतर आरोपींनी विलासचा मृतदेह कोराडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील सुरादेवी शिवारात जमिनीत पुरुन टाकला. अचानक विलास बेपत्ता झाल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता, तब्बल सात महिन्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.