नागपूर : अखेर राज्यातील महायुती सरकारमधील मंत्रिमंडळाचा विस्तार काल पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांकडून शपथ घेण्यात आली. यामध्ये 33 कॅबिनेट मंत्र्यांचा तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19 मंत्री, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 मंत्र्यांचा समावेश आहे. आजपासून (सोमवार) मंत्रिमंडळ विस्तारानंतर आता विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी आता महायुतीत नाराजी नाट्य बघायला मिळत आहे. मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या अनेक आमदारांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे अनेकजण नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी नाराज झालेल्यांना एक महत्त्वाचा सल्ला दिला असलयाचे समजत आहे.
श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच मंत्रिपदं..
शिवसेना शिंदे गटाचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली. त्यामुळे त्यांनी राजभवनावर न जाता ते थेट हॉटेलमधूनच बॅग पॅक करुन निघून गेले. तसेच प्रकाश सुर्वे, नरेंद्र भोंडेकर या शिंदे गटाच्या आमदारांचीही मंत्रिपदाची संधी हुकली आहे. त्यामुळे आता शिंदे गटात अनेकजण नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी नाराज झालेल्यांना एक मोलाचा सल्ला दिला आहे. “श्रध्दा आणि सबुरी ठेवणाऱ्यांनाच भविष्यात शिवसेनेची मंत्रिपदं दिली जातील”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
योग्य वेळी न्याय..
“मंत्रिपदं न मिळाल्याने नाराज होऊन पक्षाच्या कार्यपध्दतीवर टीका करणाऱ्यांचा भविष्यात वेगळा विचार केला जाईल. काही नाराज आमदारांनी पक्षावर टीका केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. श्रध्दा आणि सबुरी ठेवा. कुणावरही अन्याय होऊ देणार नाही. काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल. योग्य वेळी त्यांना न्याय दिला जाईल” अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे.