बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. भरधाव वेगात असलेल्या दुचाकीस्वारांनी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या घटनेत दुचाकीवरील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यातल्या वरदडा फाट्यावर मंगळवारी (ता. ८) रात्रीच्या सुमारास घडली आहे.
अधिक माहिती अशी की, गोपाल सुरडकर, धनंजय ठेंग, सुनील सोनुने अशी मृतांची नावे आहेत. मृत तरुण हे चिखली तालुक्यातील रहिवासी होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. घटनेचा पंचनामा करून तिन्ही तरुणाचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तीन तरणीबांड पोरांचा अपघातात मृत्यू झाल्याने चिखली तालुक्यावर शोककळा पसरली आहे. परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, चिखली तालुक्यात राहणारे तीन तरुण काही कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री उशिरा ते चिखली ते मेहकर मार्गावरून दुचाकीने प्रवास करीत होते. त्याचवेळी वरदडा फाट्यावर एसटी बस बंद पडलेल्या अवस्थेत उभी असताना दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणांना रात्रीच्या अंधारात एसटी बस दिसली नाही. त्यामुळे काही समजण्याच्या आतच दुचाकी एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दुचाकीचा यामध्ये अक्षरश: चुराडा झाला आहे. या अपघातात तिन्ही तरुणांचा जागीच मृत्यू झाला.