नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. भुजबळ शपथविधी सोहळ्याला नागपूरमध्ये होते, तरीही त्यांनी राजभवनातील शपथविधी सोहळ्याला उपस्थिती दर्शवली नाही. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चेनं चांगलाच जोर धरला आहे. छगन भुजबळ यांच्यासह दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, धर्मरावबाबा आत्रम यांनाही मंत्रिपदाची संधी मिळाली नाही. पण महाराष्ट्राच्या राजकारणात छगन भुजबळ यांच्या नाराजीचीच चर्चा अधिक होत आहे.
भुजबळांकडून नाराजी..
भुजबळ नाराज असल्याचे दिसूनही आले आहे. आता राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्याची प्रयत्न सुरू झाला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज आहेत. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांनी आपल्या विश्वासू व्यक्तीला त्यांच्याकडे पाठवले असल्याची माहिती मिळत आहे. अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी अजित पवारांचे निकटवर्ती प्रमोद हिंदुराव हे छगन भुजबळ यांची भेट घेण्यासाठी गेले होते. दोघांमध्ये दीर्घ चर्चा झाली. मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळांना केंद्रात महत्वाची जबाबदारी देण्याबाबत बोललं जात आहे.
भुजबळ विधानभवनाकडे रवाना भुजबळांची नाराजी दिसून आली. वरिष्ठांशी काही बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला असता, त्यावर कोण वरिष्ठ म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. अजित परांशी बोलणं झालं का? असा प्रश्न विचारला असता त्यावर मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलं.
हसन मुश्रीफ नेमकं काय म्हणाले?
छगन भुजबळ साहेब वरिष्ठ नेते आहेत. आम्ही सगळे त्यांना भेटून त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या वरिष्ठांनी त्यांच्याबद्दल काय करायचं हे ठरवलं असेल, असं मला वाटतं, असे हसन मुश्रीफ म्हणाले आहेत. छगन भुजबळ नाराज नाहीत. ते आमचे सगळ्यांचे नेते आहेत, वरिष्ठ त्याबाबत योग्य निर्णय घेतील. भुजबळांबाबत वरीष्ठांचा निर्णय आहे, असे मंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले.
सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया..
भुजबळ हे जरी नाराज असले तरी, हा त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहे. पण ते जेव्हा शरदचंद्र पवार गटात होते. तेव्हा त्यांचा आम्ही यथोचित सन्मान केला होता. तसेच त्यांची जागा नेहमी शरदचंद्र पवार यांच्या शेजारी असायची. दीड ते दोन वर्षात जे काही झालं त्यात मला पडायचं नाही, असे सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.