धुळे : राज्यभरात गणेश विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे. भाविक आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देत आहेत. शहरांसोबतच गावा गावात ट्रॅक्टर ट्रॉलीतून ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. मात्र, धुळे शहराच्या जवळ असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जनाची मिरवणूक निघण्यापूर्वीच एका ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकल्या मुलींचा मृत्यू झाला आहे.
परी शांताराम बागुल (वय 13), शेरा बापू सोनवणे (वय 6) आणि लड्डू पावरा (वय 3) अशी अपघातात मृत झालेल्या बालकांची नावे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका थांबलेल्या ट्रॅक्टरभोवती तीन चिमुकल्या मुली खेळत होत्या. तिघीही ट्रॅक्टरच्या मागील चाकाजवळ बसल्या होत्या. इतक्यात चालकाने ट्रक्टरवर चढून ट्रॅक्टर सुरू केला. मागे मुली खेळत असल्याची त्याला कल्पनाही नव्हती. ट्रॅक्टर या तीन चिमुकल्या मुलींच्या अंगावरुन गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी ट्रॅक्टरकडे धाव घेत मुलींना चाकाखालून बाहेर काढले मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेत एक महिला देखील गंभीररित्या जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच इतर पाच ते सहा जणांचा देखील दुखापत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पोलिसांनी अपघातग्रस्त ट्रॅक्टर ताब्यात घेतला आहे. तसेच, चालकाला ताब्यात घेऊन त्याची सखोल चौकशी केली जात आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर गावात शोककळा पसरली असून पोलिसांनी घटनास्थळी धावून घटनास्थळाचा पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.