घाटंजी (यवतमाळ) : भारतीय जनता पार्टी केंद्रीय निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पक्ष विधीमंडळ गटनेते पदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली. त्यानिमित्त आज दुपारी १२ वाजता भारतीय जनता पक्षाने तालुका स्तरावर एकत्रित येऊन झेंडे, ढोल ताशांच्या गर्जनेसह व फटाक्यांच्या आतिषबाजीने जल्लोष साजरा केला.
आमदार राजूभाऊ तोडसाम यांच्या सूचनेनुसार तालुक्यातील व शहरातील पदाधिकाऱ्यांनी व भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन आनंद उत्सव साजरा केला. यावेळी घाटंजी शहरातील पालतेवार कृषी केंद्रा जवळुन ते पोलीस स्टेशन पर्यंत रॅली काढण्यात आली. जयस्तंभ चौकापर्यंत फटाके फोडून व मिठाई वाटून जल्लोष करण्यात आला. पोलीस स्टेशन जवळील जयस्तंभ चौकात शहिद स्मारकाला यावेळी पुष्पहार अर्पण करुन रॅली ची सांगता करण्यात आली.
यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष सुरेश डहाके, शहर अध्यक्ष राम खांडरे तसेच शहर व तालुक्यातील सर्व बुथ प्रमुख, शक्ति केंद्र प्रमुख, सर्व शहर, तालुका पदाधिकारी, कार्यकारणी सदस्य, युवा मोर्चा, महिला मोर्चा व सर्व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.