नागपूर : महायुती सरकारच्या विधिमंडळ अधिवेशनाच्या रणधुमाळीत सध्या विधान परिषदेच्या सभापती निवडीची लगबग सुरु झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदी पुन्हा एकदा राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. त्यानंतर आता विधानपरिषद सभापतीपदी कोणाची वर्णी लागणार याची उत्सुकता सर्वानाच आहे.
सध्या राज्य सरकारचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. यातच विधानपरिषदेच्या सभापतीच्या निवडीचा मुहूर्त पार पडणार आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या डॉ. निलम गोऱ्हे या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. दरम्यान, सभापती पद रिक्त असल्यामुळे आता विधान परिषदेच्या सभापतींची देखील लवकरच निवड केली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
भाजपकडून राम शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. विधानपरिषद सभापती पदासाठी राम शिंदे यांचे नाव चर्चेत आहे, भाजपकडून उद्या सकाळी राम शिंदे अर्ज दाखल करण्याची शक्यता असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपकडून राम शिंदे यांचं पुनर्वसन करण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या विधासभा निवडणुकीत राम शिंदे यांचा रोहित पवार यांनी कर्जत जामखेड मतदार संघातून पराभव केला आहे.
दरम्यान, भाजपने 132 जागांवर विजय मिळवत राज्यातील सर्वात मोठा पक्ष होण्याचा बहुमान मिळवला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली आहे. असं असताना आता विधानपरिषदेच्या सभापतींच्या निवडीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागले आहे. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे यांनाच पुन्हा सभापतीपदाची संधी मिळेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांना आहे. मात्र, भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात येणार असल्याचे माहिती सूत्रांनी दिली असून उद्या राम शिंदे अर्ज भरणार आहेत.