घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील आदिवासी 17 संवर्गाची पेसा भरती घेण्यात यावी, अशी मागणी घाटंजी तालुक्यातील आदिवासी सरपंच संघटनेचे प्रशासनाकडे केली आहे. यासाठी नाशिक येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्याचे उपोषणाला घाटंजी तालुक्यातील सरपंच संघटनेचे पाठिंबा दर्शविला आहे.
नाशिक येथील उपोषणाला समर्थन म्हणून उमेश कुडमते यांच्या नेतृत्वात घाटंजी तालुक्यातील आदिवासी सरपंच संघटनेने नायब तहसीलदार संजय होटे यांना निवेदन सादर केले आहे. तक्रारीच्या प्रति राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत यांना तहसील कार्यालय घाटंजी मार्फत पाठविण्यात आले आहे. नाशिक येथील उपोषणाला घाटंजी तालुक्यातील आदिवासी सरपंच संघटनेचे पाठींबा दर्शवून पेसा पद भरतीचा प्रश्न लवकरात लवकर निकाली काढावा अशी मागणी करण्यात आली आहे. पेसा पद भरती ही कायम स्वरूपी घेण्यात यावी, त्याच प्रमाणे पेसा कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणी या वेळी घाटंजी तालुक्यातील आदिवासी सरपंच संघटने तर्फे करण्यात आली आहे. जर पेसा भरतीची अंमलबजावणी करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा घाटंजी तालुक्यातील आदिवासी सरपंच संघटनेचे दिला आहे.
या बाबतचा इशारा आदिवासी सरपंच संघटनेचे निवेदना द्वारे शासनाला दिला आहे. निवेदन देतांना सरपंच संघटनेचे अध्यक्ष तथा झटाळा ग्रामपंचायतचे उपसरपंच रवी मसराम, सुधाकर कोहचाडे, लक्ष्मन कोवे, शुभांगी पुसानके व इतर सरपंच, उपसरपंच तसेच घाटंजी पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश धुर्वे, पत्रकार बंडू तोडसाम, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माणिक मेश्राम, अमोल गेडाम या सह घाटंजी तालुक्यातील सरपंच संघटनेचे इतर पदाधिकारी या वेळी आवर्जून उपस्थित होते.