घाटंजी (यवतमाळ) : नैसर्गिक सौंदर्याने परिसरात प्रसिद्ध असलेल्या येळाबारा येथील धबधब्यावर तरुण युवक, युवतींची मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. घाटंजी तालुक्यातील दोन युवक धबधबा पाहण्याचा आनंद घेत असतांना, क्षणात एकाचा पाय ओल्या गोट्यावरून घसरला आणि दोघेही पाण्यात पडल्याने वाहून गेले. ही घटना येळाबारा येथील धबधब्यावर घडली.
सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या चमूला पाचारण करण्यात आले. त्यातील देवराज संतोष गेडाम (रा. घाटी – घाटंजी) यांचा मृतदेह हाती लागला, असून दुसऱ्या युवकाचा शोध सुरु आहे. देवराज संतोष गेडाम (वय-20) रा. घाटी ता. घाटंजी व त्याचा सहकारी मित्र सचिन विठ्ठल प्रधान (वय-25) रा. घाटंजी हे 17 ऑगस्ट रोजी येळाबारा येथील धबधब्यावर गेले होते. धबधबा पाहत असतांना त्यांचा पाय ओल्या गोट्यावरून घसरला व दोघेही पाण्यात वाहून गेले.
या घटनेची माहिती वडगांव पोलीस स्टेशनला देण्यात आली. तेव्हा ठाणेदार संजीव खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार धनंजय शेखदार, अक्षय डोंगरे हे घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पाण्यात वाहून गेलेल्या दोघांचा शोध घेतला. परंतु, रात्री उशिरा पर्यंत त्यांचा शोध लागला नव्हता. त्यामुळे एनडीआरएफच्या चमूला पाचारण करण्यात आले. शोध घेतल्यानंतर देवराज संतोष गेडाम याचा मृतदेह मिळाला असून सचिन विठ्ठल प्रधान याचा शोध सुरु आहे.