मोर्शी : नात सुनेने आजे सासूच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याची घटना शनिवारी (दि. 4) सायंकाळी घडली. नात सुनेने स्वतः पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली.
मोर्शी शहरातील मोर्शी ते अमरावती रोडवर असलेल्या पंजाबराव देशमुख कॉलनी येथील प्रतीक पांडुरंग पाचघरे यांचे घर असून, त्यांच्या घरी त्यांची पत्नी दीपाली प्रतीक पाचघरे व त्याची आई व आजी गोदाबाई हिरामनजी देवघरे (वय 80) हे कुटुंब राहत होते.
दरम्यान, शनिवारी प्रतीक दुकानात गेला होता. त्याची आजी नेहमीप्रमाणे वयोवृद्ध असल्यामुळे एका खोलीत झोपली होती. तर आई कामानिमित्त घराच्या स्लॅबवर गेली असल्याची संधी साधून नात सून दीपालीने प्रतीकची आजी गोदाबाई झोपलेल्या अवस्थेत असताना तिच्या अंगावर पेट्रोल टाकून जिवंत जाळले.
घरासमोरच श्री स्वामी समर्थाचे केंद्र असल्याने त्या ठिकाणी पारायण सुरू होते. त्यावेळी महिलांना आग लागल्याचे दिसून आले. त्यांनी घराकडे धाव घेतली. स्लॅबवर असलेली प्रतीकची आईसुद्धा खाली उतरून बघितले असता गोदाबाई शंभर टक्के जळून मृत्युमुखी पडलेली दिसली. आजूबाजूच्या लोकांनी पाणी टाकून आग विझवली.