Crime News: बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथे एका लग्न समारंभात घडलेल्या हिंसक प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. आनंदाच्या वातावरणात सुरू असलेल्या विवाह सोहळ्यात अचानक झालेल्या भांडणामुळे एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे लग्नसमारंभातील आनंदावर विरजण पडले.

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव गजानन जाधव हा युवक गावातील लग्न कार्यक्रमासाठी उपस्थित होता. लग्न विधी पूर्ण झाल्यानंतर जेवणावळी सुरू असताना त्याचा गावातील नितीन सपकाळ याच्यासोबत वाद झाला. सुरुवातीला हा वाद किरकोळ होता. मात्र काही क्षणातच परिस्थिती बिघडली. संतापलेल्या नितीनने त्याच्यासोबत असलेल्या मयुरेश दसरकर याच्याकडील चाकू घेतला आणि गौरववर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे उपस्थितांमध्ये घबराट पसरली.
या घटनेमागे काही दिवसांपूर्वी झालेल्या कावड यात्रेतील वाद कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. त्या वेळी दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्याच रागातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. हल्ल्यात गौरव जाधव गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, भांडण थांबवण्यासाठी पुढे आलेल्या अरुण सुभाष जाधव यांनाही आरोपीने ढकलले आणि वार केल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली. या घटनेनंतर लग्नस्थळी भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच बुलढाणा शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. जखमी तरुणाच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरू आहे. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







