पुणे: पुण्यातील येरवडा पोलीस ठाणे येथे कोठडीत असलेल्या (Yerwada) पोक्सो गुन्ह्यातील आरोपीने बाथरूमच्या खिडकीची काच काढून पळ काढल्याची गंभीर घटना उघड झाली आहे. या प्रकरणात (Police Suspension) कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन शिंदे यांना निलंबित करण्यात आले आहे. निलंबनाचा आदेश पोलीस उपायुक्त चिलुमुला रजनिकांत यांनी दिला.

शैलेश राजू मोहिते (वय 18, रा. येरवडा) याला पोक्सो गुन्ह्यात 5 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्याला 10 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 8 फेब्रुवारी रोजी रात्री सुमारे पावणे आठच्या सुमारास ही घटना घडली.
माहितीनुसार, आरोपीने गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याकडे चादरीची मागणी केली. नियमानुसार चादर देणे अपेक्षित असताना आरोपीला लॉकअपमधून बाहेर काढून बाथरूमजवळून चादर घेण्यासाठी पाठवण्यात आले. त्यावेळी आरोपीसोबत कर्मचारी जाणे आवश्यक होते; मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले. या संधीचा फायदा घेत आरोपीने बाथरूमच्या खिडकीच्या काचा काढल्या आणि तेथून पळ काढला.
आरोपी फरार झाल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदवून शोधमोहीम सुरू करण्यात आली. या घटनेमुळे पोलिसांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोठडीत असलेल्या आरोपींवर काटेकोर नजर ठेवणे ही मूलभूत जबाबदारी असताना निष्काळजीपणामुळे गंभीर प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.
पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू ठेवला असून विभागीय चौकशीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. या घटनेनंतर कोठडीतील सुरक्षा नियम अधिक कठोर करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.






