पुणे: पुणे शहरातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या कात्रज–कोंढवा मार्गावरील नागरिकांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. या महत्त्वाच्या रस्ता रुंदीकरण प्रकल्पाला राज्य शासनाने गती दिली असून भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार या प्रकल्पाला प्राधान्याने वेग देण्यात येत आहे.
कात्रज–कोंढवा हा मार्ग शहरातील दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे. त्यामुळे या मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक होते. सध्या ताशी सुमारे १५ हजारांहून अधिक वाहनांची ये-जा होत असून त्यात अवजड वाहनांचे प्रमाणही मोठे आहे. बोपदेव घाट आणि दिवे घाटमार्गे येणारी वाहतूक याच रस्त्यावर अवलंबून असल्याने दररोज मोठ्या प्रमाणात कोंडी होते. त्यामुळे या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून रस्ता रुंदीकरणाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात ५० मीटर रुंदीचा रस्ता विकसित केला जाणार आहे. एकूण ८४ मीटरच्या विकास आराखड्यातील हा पहिला टप्पा असून जून २०२६ पर्यंत तो पूर्ण करण्याचे नियोजन आहे. सुमारे ३.५ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी भू-संपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.
या टप्प्यात १२९ मिळकतींमधील सुमारे ५२,६३० चौरस मीटर क्षेत्र संपादित केले जाणार आहे. सध्या जागेवर बॉण्ड्री मार्किंग आणि झाडांची मोजणी सुरू असून विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रक्रिया राबवली जात आहे. महापालिका आयुक्त नवल किशोर राम आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या मार्गदर्शनाखाली संयुक्त समिती या कामावर लक्ष ठेवून आहे.
या प्रकल्पासाठी राज्य शासनाकडून सुमारे १४० कोटी रुपये, तर महापालिकेकडून सुमारे ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे भू-संपादनासाठी आवश्यक १०० टक्के निधी जमा झाल्याने प्रकल्पाला आर्थिक बळ मिळाले आहे.
रुंदीकरणाच्या पहिल्या टप्प्यात मुख्य रस्त्यासह दोन्ही बाजूंना सर्विस रस्ते, पावसाळी वाहिन्या आणि माऊली नगर येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात येणार आहे. अंतिम आराखड्यात सायकल ट्रॅक, फूटपाथ, पार्किंग आणि युटिलिटी डक्टचा समावेश करण्यात येणार आहे. तसेच NHAI मार्फत राजस चौक येथे उड्डाणपुलाचे काम सुरू असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सुमारे ४०० मीटरचे सर्विस रस्ते तयार केले जात आहेत.
सध्या या प्रकल्पाचे सुमारे ३२ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम वेगाने सुरू आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कात्रज–कोंढवा मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.






