शिरूर: शिरूर तालुक्यात अमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यात आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून, मेफेड्रोन (एमडी) या घातक ड्रग्सची विक्री करणाऱ्या एका अल्पवयीन बालकाला पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण व शिरूर पोलीस स्टेशन यांनी संयुक्तरित्या ही कारवाई करत तब्बल 1 लाख 38 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शनिवारी (ता. 11) संध्याकाळी 7 ते 8 वाजण्याच्या दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या शिरूर उपविभागीय पथकाकडून गुन्हे नियंत्रण व अमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू असताना, शिरूर बायपास परिसरातील बंद पडलेल्या ‘नाना स्पॉट’ हॉटेलजवळ एक अल्पवयीन बालक मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या सूचनेनुसार पोलिसांनी तत्काळ सापळा रचला.यावेळी संशयित बालकाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून 6.94 ग्रॅम वजनाचा मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.या ड्रग्सची किंमत सुमारे 1 लाख 38 हजार 800 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात विविध कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे,उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर तसेच शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, संजू जाधव, अक्षय कळमकर व नीरज पिसाळ यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान,शिरूर तालुक्यात खुलेआम ड्रग्सची विक्री होत असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होत असून, यामुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.ड्रग्स माफियांची पाळेमुळे उखडून काढण्यासाठी पोलिसांनी आणखी कठोर व व्यापक कारवाई करावी,अशी जोरदार मागणी आता नागरिकांकडून होत आहे.







