पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड परिसरातील चऱ्होली बुद्रुक येथे कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली आहे. मुलीच्या ट्युशन फी भरण्याच्या कारणावरून संतापलेल्या पतीने पत्नीवर लाकडी काठीने मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी 28 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 एप्रिल 2026 रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

फिर्यादी महिलेने आपल्या पतीला मुलीच्या ट्युशनची फी भरण्याबाबत सांगितले. यावरून संतापलेल्या पतीने तिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यानंतर त्याने लाकडी काठीने पत्नीच्या पाठीवर, तोंडावर आणि डोक्यावर वार केले. या मारहाणीमध्ये महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला.
यावेळी सासूनेही हस्तक्षेप करत फिर्यादीला चापट्या मारल्या आणि घराबाहेर हाकलून दिल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर जखमी अवस्थेत महिलेने पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी पती आणि सासूविरुद्ध गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकारामुळे कौटुंबिक हिंसाचाराचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.







