Crime News: चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती शहरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत भीषण घटना उघडकीस आली आहे. झाडे प्लॉट परिसरात राहणाऱ्या एका सख्ख्या भावाने आपल्या 32 वर्षीय बहिणीची धारदार शस्त्राने गळा चिरून निर्घृण हत्या (Murder) केली आहे. या जीवघेण्या हल्ल्यामधे पडलेल्या आईलाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे संपूर्ण भद्रावती परिसरात भीतीचे आणि खळबळजनक वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सूरज शंकर भोंडे असे 28 वर्षीय आरोपीचे नाव असून त्याने आपली बहीण संजीवनी भोंडे हिचा जीव घेतला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या आईचे नाव पुष्पा भोंडे आहे. गेल्या काही दिवसांपासून या कुटुंबामध्ये सातत्याने वाद सुरू होते. संपत्तीच्या वादातून हे टोकाचे पाऊल उचलले गेल्याची प्राथमिक शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मयत मुलगी आणि आई वेगळ्या ठिकाणी राहत होत्या, तर आरोपी मुलगा आणि त्याचे वडील एका स्वतंत्र घरात राहत होते.

नेमकं त्या दिवशी काय घडलं?
रविवारी संध्याकाळच्या सुमारास या कुटुंबात पुन्हा एकदा कडाक्याचे भांडण झाले. हा वाद इतका विकोपाला गेला की, रागाच्या भरात सूरजने धारदार शस्त्र काढून बहिणीवर वार केले. आपल्या लेकीला वाचवण्यासाठी आईमध्ये पडली असता सूरजने त्यांच्यावरही हल्ला केला. या रक्तपातात संजीवनीचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच भद्रावती पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठले आणि पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी सूरजला बेड्या ठोकल्या असून त्याचे वडील शंकर भोंडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भरवस्तीत घडलेल्या या हत्याकांडामुळे नागरिक सुन्न झाले आहेत. भद्रावती पोलीस आता या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, हत्येमागील निश्चित कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.






