पुणे, ता. 01 : जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेदरम्यान जमावाकडून झालेल्या अमानुष हल्ल्यामुळे ग्रामपंचायत अधिकारी स्व. पी. एन. पाटील यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या हादरवून सोडणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी ‘महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन’ (DNE 136, जिल्हा शाखा पुणे) च्या वतीने मंगळवारी (ता. 01) पुणे शहरात भव्य मूक मोर्चा काढण्यात आला.

पुणे जिल्हा परिषद कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मूक मोर्चात जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत अधिकारी संप्तप्त भावनेने सहभागी झाले होते. शिवरे घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी 18 ऑगस्ट 2026 पासूनच ग्रामसभांच्या कामकाजावर पुकारलेला बहिष्कार ठामपणे सुरू ठेवला आहे. अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कडक आणि ठोस कायदेशीर उपाययोजना लागू करेपर्यंत हा बहिष्कार मागे घेतला जाणार नाही, असा इशारा युनियनने दिला आहे.

पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे प्रमुख मागण्या
कर्तव्य बजावत असताना स्व. पी. एन. पाटील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या सर्व समाजकंटकांवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करावी व खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमात तातडीने सुधारणा करून वर्षातून 10 ते 12 ग्रामसभा घेण्याऐवजी केवळ एकच ‘आर्थिक नियोजन व आढावा ग्रामसभा’ ठेवण्याची कायदेशीर तरतूद करावी.

ग्रामसभेत त्रयस्थ व्यक्तींकडून सोशल मीडियासाठी केल्या जाणाऱ्या अनधिकृत व्हिडिओ चित्रीकरणावर कायदेशीर बंदी घालावी, संवेदनशील, वादग्रस्त व मोठ्या ग्रामपंचायतींच्या बैठकांसाठी प्रशासनाने सक्तीने व मोफत पोलीस बंदोबस्त पुरवावा, कृषी, आरोग्य, समाजकल्याण इत्यादी विभागांच्या योजनांच्या विशेष ग्रामसभांची संपूर्ण जबाबदारी संबंधित विभागांवर सोपवण्यात यावी. वैयक्तिक लाभाच्या योजनांचे लाभार्थी ग्रामसभेत निवडण्याऐवजी तालुका/पंचायत समिती स्तरावर संबंधित विभागांमार्फत छाननी करून अंतिम केले जावेत.
आंदोलनाचा इशारा…
युनियनचे जिल्हाध्यक्ष अमोल महादेव घोळवे व जिल्हा सरचिटणीस संदीप नारायण ठवाळ यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले. शासनाने या रास्त मागण्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यास राज्यभरात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा ग्रामपंचायत अधिकारी युनियनने दिला आहे.
दरम्यान, यावेळी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत अधिकारी युनियन, पुणे जिल्हा कार्यकारणी सदस्य विविध ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.






