उरुळी कांचन, (पुणे) : बिबट्याच्या भीतीपोटी शेतकरी शेतात जात नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी डाळिंब बागेतील काढणीस आलेला शेलका शेलका माल पळवून नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. सोमवारी (ता. 31) मध्यरात्रीच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरील बोरीभडक (ता. हवेली) हद्दीतील म्हेत्रे वस्ती परिसरात हा प्रकार घडला असून, मंगळवारी सकाळी चोरी उघडकीस आली. या घटनेत तीन शेतकऱ्यांचे तब्बल अडीच ते तीन लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरीभडक येथील रेल्वे लाईन परिसरात मागील 4 ते 5 दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांनी पाहिले होते. शेती डोंगराळ परिसरात असल्याने आणि बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकरी रात्रीच्या वेळी पिकांची राखण करण्यासाठी जाणे टाळत होते. याचाच गैरफायदा अज्ञात चोरट्यांच्या टोळीने घेतला. एकमेकांना लागून असलेल्या तीन शेतकऱ्यांच्या डाळिंब बागेत कोणीही नसल्याची खात्री करून चोरट्यांनी शेतातील झाडांवरून शेलका आणि उत्तम दर्जाचा डाळिंबाचा माल खुडून नेला.

चोरट्यांनी एकाच रात्रीत तिन्ही शेतकऱ्यांच्या शेतात घुसून डाळिंबाचे 120 ते 130 कॅरेट भरून माल वाहनातून पळवून नेला. यामध्ये अमोल म्हेत्रे व तुषार म्हेत्रे यांच्या शेतातील 50 ते 55 कॅरेट तर श्रीनाथ म्हेत्रे यांच्या शेतातील अंदाजे 20 ते 25 कॅरेट डाळिंब असे एकूण 125 ते 130 कॅरेट डाळिंब चोरट्यांनी लांबवले असून, यामुळे या तीनही शेतकऱ्यांचे अडीच ते तीन लाख रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. वर्षभर उन्हा-तान्हात राबून आणि भांडवल लावून तयार केलेले पीक अशा प्रकारे चोरीला गेल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडले आहेत.

दरम्यान, एकीकडे वन्यजीवांचा धोका आणि दुसरीकडे हाता तोंडाशी आलेला घास हिरावून नेणारे चोरटे, अशा दुहेरी संकटात बोरीभडक व परिसरातील बळीराजा सापडला आहे. या भयंकर चोरीच्या घटनेमुळे परिसरात तीव्र असंतोष आणि भीतीचे वातावरण आहे. यवत पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ या डाळिंब चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी बोरीभडक आणि म्हेत्रे वस्तीतील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.







