उरुळी कांचन : उरुळी कांचन येथील नामांकित अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन संचलित ‘डॉ. अस्मिता प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज’च्या विद्यार्थ्यांनी यंदा वैद्यकीय क्षेत्रात यशाचा नवा झेंडा फडकवला आहे. कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय पात्रता व प्रवेश परीक्षेत दणदणीत यश मिळवून थेट एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या यशाबद्दल शाळेत गुणगौरव व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

कु. समृद्धी सदाशिव भागेपल्ले हिने NEET परीक्षेत 720 पैकी तब्बल 622 गुण मिळवत महाराष्ट्रातील अत्यंत नामांकित अशा बी. जे. मेडिकल कॉलेज, पुणे येथे एमबीबीएससाठी प्रवेश निश्चित केला. तर प्रथमेश काशिनाथ राऊत याने 720 पैकी 560 गुण संपादन करत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा येथे एमबीबीएससाठी प्रवेश मिळवला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव कांचन म्हणाले, “डॉ. अस्मिता विद्यालयाचा हा वैद्यकीय क्षेत्रातील डंका म्हणजे केवळ एक सुरुवात आहे. भविष्यात या संकुलातून शेकडो विद्यार्थी वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात नाव कमवतील. अजिंक्य चॅरिटेबल फाउंडेशन हे संपूर्ण परिसरात एक ‘सायन्स हब’ म्हणून ओळखले जाईल, अशा नवनवीन विद्याशाखा व सुविधा येथे उभ्या करण्यात येतील.” यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा विशेष गौरव करण्यात आला.

प्रथमेश राऊत म्हणाला की, “शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन, आई-वडिलांचे आशीर्वाद आणि सातत्यपूर्ण मेहनत याच्या जोरावरच हे यश मिळाले आहे.”तर समृद्धी भागेपल्ले हिने आपले यश शिक्षक व आई-वडिलांना समर्पित करत, “विद्यार्थ्यांनी मनापासून मेहनत, जिद्द आणि चिकाटी ठेवली तर वैद्यकीय असो वा अन्य कोणतेही क्षेत्र, जीवनात काहीच अशक्य नाही,” असा संदेश इतर विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी संस्थेचे सचिव डॉ. अजिंक्य कांचन, कार्यकारी संचालक डॉ. आप्पासाहेब जगदाळे, विद्यालयाच्या प्राचार्य रोहिणी जगताप, ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख नानासाहेब परभणे, काशिनाथ राऊत, सुरेखा राऊत, सदाशिव भागेपल्ले, आरती भागेपल्ले व विद्यार्थी-शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब परभणे यांनी केले, तर सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार उपप्राचार्य कांचन चव्हाण यांनी मानले.






