भंडारा : भाजपच्या उमेदवाराला जिंकवण्यासाठी भंडाऱ्यात काँग्रेसचा डमी उमेदवार देण्यात आला असून, पैसे घेऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून उमेदवारी दिली जात आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे माजी आमदार सेवक वाघाये यांनी केला आहे. या आरोपाने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
सेवक वाघाये पुढे बोलताना म्हणाले की, भंडारा-गोंदियाचे महायुतीचे उमेदवार भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे नातेवाईक आहेत. त्यांना जिंकविण्यासाठीच काँग्रेसनं भंडाऱ्यात डमी उमेदवार दिला आहे. लोकसभेत भाजप जिंकणार आणि त्या बदल्यात साकोली विधानसभेचा नाना पटोले यांचा मार्ग मोकळा होणार. तसेच उमेदवारी देत असताना पैसे घेऊन उमेदवारी दिल्याचा आरोप सेवक वाघाये यांनी नाना पटोले यांच्यावर केला आहे.
दरम्यान, भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेस पक्षाकडे लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना उमेदवारी मिळाली नसल्याने ते नाराज असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेसने वाघाये यांना डावलून डॉ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळं नाराज असलेल्या सेवक वाघाये यांनी काल उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नामांकन दाखल केलं. याबाबत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, त्यावेळी त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.