अमरावती : शहरातील एका महाविद्यालयात कार्यरत कर्मचाऱ्याने विद्यार्थिनीवर अत्याचार केला. ही धक्कादायक घटना शनिवार, २८ सप्टेंबर रोजी रात्री नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक करण्यात आली आहे. अमोल वासुदेवराव रेचे (३६ रा. गजानन टाऊनशिप, अमरावती) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पीडित १८ वर्षीय विद्यार्थिनी ही शहरातील एका महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहे. आरोपी अमोल हा त्याच महाविद्यालयात लिपिक म्हणून काम करतो. दरम्यान, शनिवार, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास पीडित विद्यार्थिनी ही घरी एकटीच होती. त्यावेळी अमोलने तिच्या मोबाइलवर मी घरी येऊ का, असा मेसेज केला. त्यावर तिने नकार दिला. मात्र, त्यानंतरही अमोल हा तिच्या घरी गेला. त्याने तिला प्यायला पाणी मागितले. त्यानुसार तिने त्याला पाणी दिले.
त्यानंतर अमोलने तिला आपल्या जवळ बसायला सांगितले. त्याचवेळी तो तिच्या अंगाला स्पर्श करु लागला. त्याला तिने नकार दिला. तिने प्रतिकारसुद्धा केला. तो प्रतिकार मोडून काढत अमोलने जबरदस्तीने तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर अमोल हा तेथून निघून गेला. अचानक घडलेल्या या प्रकाराने ती प्रचंड घाबरली. ती रडत रडत शेजारी राहणाऱ्या काकूंकडे गेली. दरम्यान, आई-वडील घरी आल्यावर तिने आपबिती त्यांच्याकडे कथन केली. पालकांनी धीर दिल्यावर पीडितेने तातडीने नांदगाव पेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अमोलविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला तातडीने अटक केली.