वर्धा: मराठा समाजाला सरसकट ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ या मागणीसाठी वर्ध्यात शनिवारी ओबीसी मेळाव्याचा आयोजन करण्यात आले होते. मात्र, या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ यांची गैरहजरी पाहायला मिळत आहे. भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, या सभेला गर्दीच झाली नसल्याने मंत्री भुजबळ यांनी सभेला येण्याचे टाळले असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्रभर ओबीसी मेळाव्याचे आयोजन करण्यात येत असून, शनिवारी वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ यांची प्रमुख उपस्थिती असणार होती. मात्र, भुजबळ यांची प्रकृती ठीक नसल्याने ते या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच, डॉक्टरांशी चर्चा करून रविवारी ठाणे येथे होणाऱ्या सभेला जायचं की नाही? याबाबत छगन भुजबळ निर्णय घेणार असल्याची माहिती देखील समोर येत आहे.